छत्रपती शाहू जी महाराज

लेखक- माधवराव बागल
✒️छत्रपती शाहू महाराज इतक्या थोर मनाचा, अस्पृश्यांना समानतेने वागवणारा, राजा ब्राह्मण जातीचा द्वेष करणे शक्य आहे काय? पण त्यांचा ब्राह्मण्याने अपमान केला आहे, कुत्र्यानिपट मानले आहे. मग त्या शिवाशिवीची व ब्राह्मण्याची चीड महाराजांना का येऊ नये व ते ब्राह्मण्य, ती शिवाशिव नष्ट करण्याचा त्यांनी विडा का उचलू नये?
✒️मला बॅ. केळवकर मंत्री यांनी सांगितलेली गोष्ट.
महाराज साताऱ्याला गेले होते. जेवण त्यांनीच करायला सांगितले होते. सोवळेकरी मात्र ब्राह्मण होता, जेवणाची वेळ होत आली. महाराज स्नान करून जेवण कुठपर्यंत आले आहे हे पाहण्याकरता हिंडू लागले. बरेचसे हंडे शिजत होते. एक उघडा बंब सोवळेकरी हातावर मांजर घेऊन मध्ये हिंडत होता. त्याने महाराजांना पाहिले अनु तो महाराजांना म्हणाला, ‘आपल्याला इकडून हिंडता येणार नाही. शिवाशिव झाली म्हणजे साराच घोटाळा उड़न जाईल.’ एक सोवळेकरी खुद्द शाहू छत्रपतींना हे बोलतो!
✒️तरी महाराज सूडबुद्धीने वागले नाहीत. आपल्या संस्थानात मोठमोठ्या जागांवर इतरांबरोबर ब्राह्मणांनाही त्यांनी नेमले होते. अगदी जवळचा विश्वासू व प्रत्येक बारीक सारीक गोष्टी समजू शकेल अशा खाजगी कारभाऱ्याच्या जागेवर कुंभोजकर ब्राह्मण होते. सरन्यायाधीश गोखले, नतंर पंडितराव, राजाराम कॉलेजचे प्रोफेसर आपटे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट घोलकर, सोनटक्के, रात्रंदिवस जवळ असणारे चिटणीस , पेंडणे ही सारी मंडळी ब्राह्मण होती आणि विश्वासातली होती. बालगंधर्व, टेंबे यांना महाराजांचा आश्रय होता. करमरकर, सांगलीचे अभ्यंकर वकील यांना त्यांनी हजारो रुपये मिळवून दिले. तोफखाने मास्तर तर जवळ जेवण सल्लागार होते. त्या महाराजांना ब्राह्मणद्वेष्टे कधी तरी म्हणता येईल का?
✒️सर्व जातींना समान लेखणारा असा थोर राजा होता आमचा शाहू छत्रपती. प्रत्येक जातींची बोर्डिंगे काढून देऊन सर्व जातींना त्यांनी शिक्षणाच्या सोयी करून दिल्या. खालच्या वर्गाला पक्षपाती सवलती दिल्याशिवाय वर डोके काढता येणार नाही, म्हणून त्यांनी त्यांना खास सवलती दिल्या.
✒️या त्यांच्या पक्षपाताबद्दल सांगलीच्या अभ्यंकर वकिलांनी त्यांच्यावर टीका केली, तेव्हा महाराज त्यांना घोड्यांच्या थट्टीत घेऊन गेले. थट्टीत लहानथोर घोडी मोकळीच होती. त्यांना देण्यासाठी त्यांनी एका जाजमावर हरबरे टाकायला सांगितले. त्याबरोबर घोडी हरबरे खायला धावत आली. धडधाकट सशक्त होती. त्यांनी पुढे होऊन सारे हरबरे फस्त केले. रोडकी, अशक्त, रोगी मागेच राहिली. मग महाराज म्हणाले,
“बघितलंत हे अभ्यंकर? म्हणून रोग्यांना वाचविण्याकरिता तोबऱ्यात हरबरे भरून द्यावे लागतात. तीच गोष्ट मागासलेल्या जमातीची. त्यांना खास सवलती दिल्या नाहीत, तर ते डोके वर कसे काढतील ?
✒️✒️✒️ त्या या जनतेशी एकरुप झालेल्या राजावर स्वराज्यद्रोही म्हणून आरोप करण्यात येत होता. पण स्वराज्याविषयीची त्यांची त्या वेळची व्याख्या आज सर्वमान्य झाली आहे. ते म्हणतात,
“आम्हांला स्वराज्य मिळावे अशी खरोखरीच आमची इच्छा आहे. याच्या योगे आम्हाला जीवनरक्त मिळेल. परंतु याबरोबर माझा ठाम सिद्धांत म्हणून सांगावेसे वाटते, की हल्लीची जातिभेदाची शृंखला तोडल्यावाचून आपले चालावयाचे नाही. ज्यांना राजकारणात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी इतर देशांप्रमाणे याही देशात प्रत्येक मनुष्याला मनुष्यत्वाचे सर्व अधिकार दिले पाहिजेत. नाही तर आमच्या हातून मुळीच देशसेवा होणार नाही.”
✒️✒️✒️महाराजांनी आपल्या विचाराने, वक्तृत्वाने, चातुर्याने सर्व महाराष्ट्रावरच नव्हे तर इतर प्रांतांवरही छाप पाडली होती. अनेक प्रचंड जाहीर सभांचे ते अध्यक्ष झाले होते. १९२० साली हुबळी येथे महाराजांच्या अध्यक्षतेखाली भरलेली ब्राह्मणेतर सामाजिक परिषद फारच गाजली. मुंबई प्रांतात आपली माणसे निवडून आणून त्या नाड्या ते आपल्या हातात ठेवू लागले होते. तेव्हा ही वाढती शक्ती आपल्यास जड होईल म्हणून सरकारने त्यांना बाहेर न जाण्याचा सल्ला दिला, तेव्हा आपल्या एका बड्या अधिकारी मित्रास ते लिहितात- बहुधा ते सरसबनीस असावेत
‘सरकार रागावेल असे तुम्ही म्हणता. रागावो बिचारे ! गरजवंतांना मदत केल्याबद्दल, अस्पृश्यांना हात दिल्याबद्दल आणि मराठ्यांचा उद्धार करण्याकरता माझी शक्ती खर्च केल्याबद्दल परमेश्वराकडून मला खचित न्याय मिळेल. लॉर्ड…यांनी तर काय, पण खुद्द ब्रह्मदेवाने अथवा यमाने धमकी घातली आणि मी भ्यालो, तर माझे पूर्वज माझ्याकडे पाहून हसतील. भित्र्या भागूबाईप्रमाणे मी माझी मते सोडणार नाही किंवा जीव बचावण्यासाठी शरण जाणार नाही.
✒️✒️✒️तो राजा स्वराज्यद्रोही होय? महाराजांचे कट्टर विरोधी लो. टिळक हे ज्या दिवशी मुंबईस वारले व ती तार महाराजांनी वाचली, त्या वेळी त्यांनी आपल्या पुढचे ताट बाजूस सारले व म्हणाले, ‘अरेरे ! देशातील एक मोठा राजकारणी महापुरुष व माझा सामनेवाला गेला !
महाराजांच्याबद्दल मद्रासचे इंग्रजी दैनिक ‘जस्टिसने’ त्यांच्या निधनानंतर लिहिलं,
The Maharaja of Kolhapur, the descendent of the great Shivaji -was a prince among men and a man among princess. His majestic figure, his robust optimism, the iron will of which he was a master, his kindly and generous disposition marked him out as a true Maratha of the best and noblest type. Born at other periods he would have founded an Empire and created a confederacy – The personal hold which he had over the people was phenomenal and reminded one of the palmy days of the Maratha Empire.
गुरुवर्य विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात
शाहू राजा नुसता मराठा नव्हता, ब्राह्मणेतरही नव्हता. तो नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता.
तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग होता.
नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात- ‘शरीरसामर्थ्य, धैर्य, बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरी, मनुष्यस्वभाव परीक्षा, उद्योगप्रियता, मतप्रचाराची हौस जितक्या प्रमाणाने शाहू छत्रपतींच्यात एकत्र आढळली तितकी
गेल्या शेपन्नास वर्षांत दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकात आढळली असेल असे मला वाटत नाही. कोहिनूरसारखा एखादा हिरा दैवयोगाने एखाद्याच वेळी खाणीत कामगारांच्या हाती लागतो. संस्थानिकांच्या खाणीतही शाहू महाराजांसारखा पुरुष यदृच्छेनेच निर्माण झाला असे म्हटले पाहिजे.’
✒️✒️✒️शाहू महाराजांच्या राजकीय जीवनाचा अभ्यास केला, सामाजिक जीवनाचे निरीक्षण केले, आणि व्यक्तिजीवन जवळून पाहिले तर त्यातून निष्कर्ष काढता येईल, की ते राजे असूनही त्यांची लोकशाही वृत्ती होती. साधुत्व होते तसे मुत्सद्दीपणही होते. कुस्तीतच ते डावपेच खेळत होते असे नाही, गव्हनर्नरांनाही खेळवत होते. त्यांची साम्राज्यनिष्ठा हा डावपेचाचा एक भाग होता. आत इंग्रजांचा द्वेष होता, स्वातंत्र्याची तळमळ होती. आतून अनेकांना प्रोत्साहन दिले जात होते.
✒️✒️नगरला छत्रपतींचा इंग्रजांनी घेतलेला सूड मनात डाचतच होता. आपल्या जनतेवर नितांत प्रेम होते. सर्वांकडे समदृष्टीने पाहत होते. सर्वांना अधिकारपदात वाटा दिला जात होता. एका जातीची मक्तेदारी नव्हती तरी खालच्या समाजाकडे प्रेमाची पक्षपाती दृष्टी होती. म्हणूनच ते राजे असूनही राजर्षी झाले.